माय सह्याद्री - अहमदनगर
विविध घटकांच्या गरजांची पूर्तता व प्राधान्यक्रम ठरवून, अधिकाधिक परिपूर्ण व दिशादर्शक होण्यासाठी आराखडा हा लोकसहभागातूनच बनवणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार राजश्री ताई घुले यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान २०२०-२१ अंतर्गत १५ वा वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचा गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव शेळके पा., सभापती सुनील गडाख, मीरा शेटे, काशिनाथ दाते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत निखिलकुमार ओसवाल आदी उपस्थित होते.
प्रत्येक गावाचा शाश्वत विकास व मानव विकास निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन वार्षिक आराखडा लोकसहभागीय पद्धतीने सन २०२० २१ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) बनवला जाणार आहे. प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यासाठी मेहनत घेत असून निश्चितच गावच्या विकासासाठी पूरक असा आराखडा तयार करण्यात येईल. हे आराखडे गावच्या सर्वांगीण विकासाला दिशा व चालना देणारे ठरतील,असे मत यावेळी अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची रूपरेषा, विविध विभागांच्या जबाबदाऱ्या, तालुका व गण पातळीवर होणारी प्रशिक्षणे व कार्यपद्धती आदीबाबतची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सादर केली. ग्रामपंचायत विकास आराखडे लोकसहभाग पद्धतीने व अधिकाधिक लोक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ व गाव पातळीवर काम करणारे कर्मचारी, ग्राम संसाधन गट आदींसाठी तसेच तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी यांचे साठी साखळी पद्धतीने प्रशिक्षणांना सुरुवात झालेली आहे. ग्रामस्थ सदर प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती व जाणीव जागृती करण्यात येत आहे.ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना ५०टक्के निधी पाणीपुरवठा व स्वच्छता आदींसाठी तर उर्वरित ५०टक्के निधी मानव विकास निर्देशांक, महिला बालकल्याण व प्रशासकीय खर्च मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार गावचा शाश्वत विकास व मानवविकास निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांचे अभिसरण करून व गावातील सामूहिक गरजा, विविध घटकांच्या गरजांची पूर्तता व प्राधान्यक्रम ठरवून, अधिकाधिक परिपूर्ण व दिशादर्शक होण्यासाठी आराखडा हा लोकसहभागातूनच बनवणे आवश्यक आहे.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ, अहमदनगर