माय सह्याद्री - शंकर मरकड

अंबादास सातपुते गुरूजी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने  येथे 1जून 1939 रोजी  गरीब कुटुंबात झाला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, या उक्तीप्रमाणे त्यांचे बालपण अतिशय खडतर राहिले शिक्षण वसतिगृहात राहून परिस्थितीशी सामना करत पूर्ण केले.  मात्र या काळात स्वानुभव मिळाला जो  गुरु ठरला. अनुभव हा तर खरा सर्वोत्तम शिक्षक आहेच,परंतु त्याची  शिकवण्याची गुरूदक्षिणा  तो अगोदरच सगळी वसूल करतो  मगच आपल्या पदरात ज्ञानाची शिदोरी टाकतो. हा अनुभवच त्यांच्या जीवनाचा प्रेरक आधार ,मार्गदर्शक बनला आणि येथुनच एका सेवायज्ञाला प्रारंभ झाला . 

गुरूजी स्वभावाने  सोज्वळ,संयमी आणि परोपकारी होते. त्यांनी शिक्षक म्हणून  1967 साली राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील जि.प.च्या शाळेत झाली.कोळेवाडी हे संपूर्ण आदिवासींची वस्ती असलेले  व चहुबाजूंनी डोंगराने वेढलेले गाव.येथील आदिवासी बांधवांना शैक्षणिक उन्नतीचे महत्त्व समजावण्यात गुरूजी कमालीचे यशस्वी झाले. याकाळात त्यांच्यातील  तळमळीने समजावण्याची कला या अंगभूत असलेल्या स्वभावाचा त्यांना खूप फायदा झाला.त्यांच्यातील समाजसंपर्क क्षमता हा अतिशय प्रभावी सद्गुण होता.

ते ज्याच्याशी संवाद करत ती व्यक्ती आपोआप त्यांची बनली जात असे. नंतर गुरूजी शिक्षक म्हणून कोळेवाडीनंतर शेवगाव तालुक्यातील शेवगाव,दहिगाव,रांजणी व नरेंद्रनगर येथे बदली झाली.प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून प्रभाव पाडलाच,परंतु नरेंद्रनगर शाळेतील त्यांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. दहिगावनेच्या  भिल्ल,कहार,वडारी अशा गोरगरीब व शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या धरणग्रस्त बांधवांची मोठी वस्ती होती.त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गुरूजींनी स्वत: पुढाकार घेऊन सहकारमहर्षी स्व.मारूतराव घुले पाटील यांच्या सहकार्याने केवळ 10 विद्यार्थी पटसंख्या असताना नवीन शाळा काढली व तिचे नामकरण जि.प.प्रा.शाळा नरेंद्रनगर असे केले.अनुभवी सहकारी लक्ष्मण टाक गुरूजी यांना दहिगाव शाळेतून मदतीला घेतले.

ज्या ठिकाणी आपणास काम करायचे आहे ,तेथील लोकांच्या अंतःकरणात शिरले पाहिजे व त्यासाठी त्यांची भाषा अवगत झाली पाहीजे,म्हणून त्यांनी प्रथम भिल्ल,कहार व वडार समाजाची भाषा शिकले.त्यांच्यात अगदी मिळूनमिसळून राहिले.मुलांना व पालकांना त्यांनी आपलेसे केले. त्यांचा खिसा खाऊशिवाय कधीही रिकामा राहत नसे.मुलांना खाऊच्या माध्यमातून तर पालकांना त्यांच्या बोलीभाषेतून आपलेसे करून केवळ तीनच वर्षात 10 वरून  इवलेशे रोप लावियेले द्वारी ,त्याचा वेल गेला गगनावरी याप्रमाणे  विद्यार्थी पटसंख्या तब्बल 235 वर नेली. .पटसंख्येप्रमाणेच भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता देखील कमालीची वाढत होती. शालेय परिसरात तब्बल 200 पेक्षा अधिक संख्येने वड,पिंपळ,कडुनिंब,निलगिरी यांची नयनरम्य वनराई निर्माण झाली.शाळेतील अनेक  विद्यार्थी क्रीडा,सांस्कृतिक अशा विविध गुणदर्शन स्पर्धेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत चमकू लागले.

 जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीम.निलीमाताई केरकट्टा तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.श्रीम.सुमनताई देशमाने यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधा व  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण  प्रगतीबद्दल  गौरवोद्गार काढले. या सर्व प्रगतीमध्ये नरेंद्रनगर शाळेचे प्रथम ग्रेड  मुख्याध्यापक  भानुदास  राऊत गुरूजी ,सर्व सहशिक्षक यांचे अनमोल सहकार्य लाभले होतेच,परंतु हा सर्वांगिण  गुणवत्तेचा जगन्नाथाचा रथ नेटाने पुढे चालविण्यात गुरूजींचे मोठे योगदान होते. सहकारमहर्षी स्व.मारूतराव घुले पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र  घुले हे जेव्हा जि.प.अहमदनगरचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती बनले,तेव्हा अनेक ठिकाणी झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी नरेंद्रनगर शाळेचा व गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

 सन 1999 साली अण्णा सेवानिवृत्त झाल्यानंतर नरेंद्रनगर शाळेच्या वतीने त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त भव्य सत्कारसमारंभाचे आयोजन केले होते.   संपूर्ण घुले परिवाराला गुरूजी गुरुजींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अभिमान वाटत होता,तर गुरूजी सुध्दा सहकारमहर्षी स्व.मारूतराव घुले पाटील यांचे निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ते म्हणूनच अखेरपर्यंत  राहीले. गुरुजींच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्यात व कौटुंबिक सुखदुःखात त्यांच्या पत्नी श्रीम.विमलताई पोटेबाई  यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली.त्यासुद्धा गुरूजी प्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणा-या शिक्षिका म्हणून सर्वपरिचित झाल्या.. सर्व प्रकारचे दैनंदिन कर्म तितक्याच उत्साहाने व आनंदाने करत असताना सर्व नातेवाईकांशी सुसंवाद साधून अगदी अचानकपणे 18 डिसेंबर 2020 रोजी ह्रदयविकाराच्या  तीव्र झटक्याने  त्यांनी इहलोकीचा कायमचा निरोप घेतला.

शिक्षणापासून वंचित असलेल्या कुटुंबांतील लेकरांना मातृत्त्वाची जाणीव देणारे, आपल्या सहकार्यांना व नवोदित शिक्षकांना पालकत्त्वाची ऊब देणारे, नातेवाईकांच्या सुखदुःखात खंबीरपणे समर्थ साथ देणारे,रंजल्या गांजलेल्यांना सदैव मदतीचा हात पुढे देणारे ,अनेक गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारणारे सेवाव्रती गुरूजी आज इहलोकात नसले,तरी त्यांचे विचार व कार्याच्या रूपाने ते अजरामर राहतील हे मात्र नक्की.  

श्रध्दांजली पर लेख -मनोहर इनामदार - प्राथ.शिक्षक व  संत साहित्याचे अभ्यासक, अहमदनगर. यांनी लिहिला आहे.

माय सह्याद्री टीम- शेवगाव, अहमदनगर.
थोडे नवीन जरा जुने