माय सह्याद्री रिपोर्ट :

शिक्षण व सहकार क्षेत्रात इतिहास घडवणारे  सहकार महर्षी लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांनी  सहकाराच्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर करण्याची किमया घडवली .महाराष्ट्रात सहकार चळवळ विसाव्या शतकापासून जोमाने सुरू होती.सन १९०४ साली सहकार कायदा अस्तित्वात आला. पतपुरवठा क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करणारा हा कायदा होता.पुढे सन १९१२ साली कर्जाव्यतिरिक्त अन्य गोष्टींचाही पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामीण सहकारी सोसायट्या काढण्यास परवानगी देण्यात आली.

सहकार व भूविकास बँका स्थापन झाल्या व हळूहळू जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सहकाराच्या कक्षा रुंदावल्या . राज्याचा डोलारा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले व राज्याला कृषी,औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर आणले.या कामासाठी त्यांनी राज्यात अनेक कार्यकर्ते तयार केले. त्यांच्यापैकी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे एक होते.

त्यांच्या परीस स्पर्शाने नगर जिल्ह्यात सहकार चळवळीचे, कृषी संस्कृतीचे सोने झाले.
अहमदनगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला प्रचलित असे लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचा जन्म श्रीरामपूर तालुक्यातील छोट्याशा खेड्यात सामान्य कुटुंबात  पडेगाव येथे १५ सप्टेंबर १९३० साली झाला. त्यांचे पूर्ण नाव विश्वनाथ दादा पाटील बनकर होते.त्यांचे व्यक्तिमत्व जिज्ञासू,अभ्यासू, दूरदृष्टी असलेले होते. लहानपणापासूनच शालेय जीवनात ते गोरगरीब मुलांना वसतिगृहात जाऊन मदत करायचे.त्यांना समाजसेवेची आवड होती.सन १९४५ ते ४७ मध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असताना स्वातंत्र्याच्या चळवळीने देशाचे वातावरण भारले होते. पुढाऱ्यांना स्वातंत्र्य शिवाय दुसरा ध्यासच नव्हता एका पेक्षा एक सरस व त्यागी नेते स्वातंत्र्याच्या चळवळीत होते. नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्य अत्यंत उत्साहात चालू होते.राष्ट्रभक्त अच्युतराव पटवर्धन,एस.एम. जोशी,रावसाहेब पटवर्धन आदीची भाषणे ऐकण्याची संधी घुले पाटलांना मिळाली. त्याच भाषणाचा परिणाम त्यांच्या मनावर झाला व गांधीजींच्या सत्य-अहिंसा-प्रेम या त्रिसूत्री वर त्यांची श्रद्धा जडली. राष्ट्रप्रेम निर्माण झाले त्यानंतर साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरात ते सात दिवस राहिल्यावर दलाचा स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले.अनेक समाज उपयोगी कार्यासाठी त्यांनी योगदान दिले नंतर सन १९४९ या काळात शेवगाव तालुक्यातील दहीगाव-ने येथे शंकरराव घुले यांनी त्यांना दत्तक घेतले. 

त्यांचे नामांतर बनकर कुटुंबातून मारुतरावजी शंकरराव घुले पाटील असे झाले.
घुले पाटील संत वाड्मयाचे गाढे अभ्यासक थोर विचारवंत बाळासाहेब भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात कार्य चालू केले.वयाच्या २५ व्या वर्षापासूनच सहकारी चळवळीत असणाऱ्या या नेत्याने सन१९५४मध्ये दहिगाव-ने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना केली. तर सन१९५८ मध्ये शेवगाव सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. सन १९५९ जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नवजीवन विद्यालय व वसतिगृहाची स्थापना केली. जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून ते संचालक होते

बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर बँकेचे संचालक म्हणून केलेल्या कामामुळे आज बँकेचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे.१९६१ मध्ये 'अखिल भारतीय कृषक समाज' नवी दिल्ली चे ते सदस्य होते मारुतरावजी घुले पाटील सन १९६२ शेवगाव-नेवासा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेले. पुढे ते १९७२ ते ७८ पर्यंत विधानसभा व विधान परिषदेवर आमदार म्हणून काम पाहिले.आपल्या पुरोगामी विचारांमुळे आरक्षणाचा कायदा होण्याच्या अगोदर मागासवर्गीय तरुणांना त्यांनी पंचायतराज संस्थेमध्ये ही प्रतिनिधित्व दिले. सन १९६६ साली जायकवाडी प्रकल्पग्रस्त,सुशिक्षित बेरोजगार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून त्यांनी शेवगाव सारख्या दुष्काळी भागात औद्योगिक संस्था स्थापन केली.मारुतरावजी घुले पाटील यांनी मुळा,जायकवाडी धरणाच्या प्रकल्पग्रस्तां करिता कायदा करावा अशी मागणी केली होती धरणग्रस्तांसाठी कायदा करण्यास भाग पाडणारे मारुतरावजी घुले पाटील हे महाराष्ट्रातले पहिले आमदार होते.

शेतकरी, कामगार,व्यापारी,मजूर, गोरगरीब,सुशिक्षित तरुण यांना संजीवनी देण्याचे काम लोकनेते यांनी केले.सन १९७० मध्ये त्यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून यशस्वी  गळीत हंगाम सुरू केला पुढे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा, हा महाराष्ट्रात आदर्श समजला जातो या कारखान्याचे तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या जडण-घडणीत लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.

मारुतरावजी घुले पाटील यांना सन १९९४ मध्ये 'ऑल इंडिया नॅशनल युनिटी कॉन्फरन्स' नवी दिल्ली यांचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, असोसिएशन नवी दिल्ली यांचा 'भारतीय उद्योगरत्न पुरस्कार'१९९६ मध्ये , सण१९९७ मध्ये सहकार व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा सहकारी बँकेतर्फे 'सहकार भूषण' पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. कर्तृत्वसंपन्न लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी सामान्य माणसाला विविध शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षण,शेती, सहकार,समाज व राजकारणात लोकनेते घुले पाटलांचे मोलाचे योगदान आहे.महाराष्ट्रातील जडणघडणीतील नव निर्मितीचे शिल्पकाराने ८ जुलै २००२ रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला.

सामान्य कुटुंबातून खडतर जीवन जगताना मारुतरावजी घुले पाटील यांनी आपला जीवन प्रवास केला जायकवाडी धरणाच्या विस्थापितांना उभारण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.सहकार उभारणीतून भागाच्या शेवगाव- नेवासा पाथर्डी या तालुक्यांसाठी मोठे योगदान दिले ते सांभाळण्याचे, वाढवण्याचे काम पुढे त्यांचे वारसदार माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी चालवले आहे. दगडात हजारो शिल्प कोरले,लाखोंनी पाहिले कुणाचे पोट भरले कुणाची भूक भागली पण साहेब मातीत कोरलेल्या तुमच्या कर्तुत्वलेण्याने सर्वांना सधन केले.जगात निर्माण झालेली महान शिल्पे आम्ही पाहिली, उद्या ती ढासळू लागतील, कोसळू लागतील,ऊनमळूनही पडतील, पण स्वकर्तुत्वाच्या पायावर उभे तुमचे शिल्प अजरामर राहील.दुसऱ्याला उपयोगी पडणाऱ्या चंदनाप्रमाणे सुगंध देणाऱ्या लोकनेते मारुतरावजी घुले पाटलांचे कार्य पिढ्यानपिढ्या 'दीपस्तंभा' प्रमाणे मार्गदर्शक आदर्शवत ठरेल.

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने