उत्पादक शेतकरी तोट्यात, विमा कंपनीनेही केले वर हात.
यंदा रब्बी व नंतर खरीप अशा दोन्ही हंगामात डाळिंब बागा मोठ्या प्रमाणावर रोगास बळी पडल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागला असुन विमा कंपनीनेही विमा परताव्या बाबद हात वर केल्याने तालुक्यातील दहिगावने, भाविनिमगाव परीसरात डाळिंबाने शेतकऱ्यांना मोठ्या संकटात लोटल्याने व भगवा डाळिंब यंदा काळवंडल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
वारंवार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे डाळिंबावर मुख्यत्वे डांब-या, या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंब काळवंडले तर मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे बागेतील झाडे उपटून टाकावे लागत असल्याचे दहिगावने येथील डाळिंब उत्पादक शेतकरी कृष्णा सातपुते व भाविनिमगाव येथील पांडुरंग मरकड यांनी सांगितले. १३० - १५० प्रती किलो जाणारा डाळिंब चक्क २०-३० रूपये भावाने जात असल्याने उत्पादन खर्च सोडाच साधा मजुरी खर्च निघनेही मोठे मुश्किल झाले असून मोठ्या निराशेचा सामना डाळिंब उत्पादक शेतकरी करत आहे. अशात विमा कंपनी नेही विमा रक्कम या भागातील शेतक-यांना देण्यास असमर्थता दर्शवल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे बागेतील झाडांची फळे डागाळली असुन झाडाखाली या डाळींबाचा सडा पडला आहे. ही डाळिंब उचलुन शेताच्या बांदावर टाकण्याची वेळ शेतक-यांवर आली असून कांद्या पाठोपाठ यंदा डाळिंबाचाही उकंडा झाला आहे.
औषधांचा परिणाम शून्य -चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादक करने हा शेतक-यांचा उद्देश असतो. त्याला हवामान, जैविक, रासायनिक खताबरोबर रोगप्रतिबंधक औषधांची मोठी साथ लागते मात्र गेल्या दोन हंगामातील डाळिंब बागांवरील कुठलाही रोग हा औषधांच्या मात्रेने आटोक्यात आला नसल्याने शेतक-यांच्या पदरात डाळिंब तर नाहीच रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की डाळिंब झाडेच मर रोगास बळी पडले आहेत. यातुन अनेक शेतक-यांना डाळिंब बागा उपटून टाकण्याची वेळ आली आहे.कृष्णा सातपुते - डाळिंब उत्पादक शेतकरी दहिगावने.
कपाशी पाठोपाठ डाळिंब विमा मिळावा-शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त कपाशी विमा मिळण्यासाठी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे व पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यांनी विमा कंपनीस जसे विरोध करत रक्कम देण्यास भाग पाडले तसेच तालुक्यातील केवळ दोन महसूल मंडळातील रखडलेल्या डाळिंब विमा प्रश्नाी प्रयत्न करावेत अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्या मधुन होते आहे.मात्र शेतक-यांचे निवेदन स्विकारण्या पलीकडे काहीच हालचाल होत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे.