जायकवाडी धरणात १६,३७८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असुन रविवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ७८.०९% झाला होता. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाण्याची आवक कायम असल्याने सोमवारी सायंकाळ पर्यंत जलसाठा ८०% होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तेथील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर, भंडारदरा, दारणा, निळवंडे ओझर वेअर व नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सध्या जायकवाडीसाठी पाणी सोडले जात आहे.
गोदावरी व प्रवरा दोन्ही नद्या दुथडी भरून वहात असून दोन्ही नदी पात्रातील पाणी जायकवाडीच्या नाथसागरात दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून १०४८६ क्युसेक्स विसर्ग सुरू असून गंगापूर धरणातून रविवारी नव्याने १०४० क्युसेक्स विसर्गास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात १२६२० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग कायम ठेवण्यात आला. यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असून जायकवाडी धरणाच्या वरील भागातील वैजापूर तालुक्यातील नागमठान येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी पात्रात १२५६० क्युसेक्स क्षमतेने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत असल्याची नोंद झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नीळवंडे धरणातून ६६४५ क्युसेक्स विसर्ग ओझर वेअर मध्ये करण्यात येत असून ओझर वेअर मधून प्रवरेच्या पात्रात कालच्या तुलनेत दुप्पट विसर्ग करण्यात आला. रविवारी १२४७१ क्युसेक्स विसर्ग सुरू होता . जायकवाडी धरणाची शनिवारी सायंकाळी पाणी पातळी १५१७.७२ फूट झाली होती. एकूण जलसाठा २४३३.५२५ दलघमी तर जिवंत पाणी साठा १६९५.४१९ दलघमी ईतका झाला होता. जायकवाडीची वाटचाल ८०% जलसाठ्याकडे होत असल्याने जायकवाडी प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संदर्भात दक्ष झाले असून त्या दृष्टीने उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.