अहमदनगर:
पुन्हा खेड्याकडे चला.....ची हाक ग्रामीण विकासास वाव असल्याचे व्यक्त केले.
पूर्वीपासून आपली जीवनपद्धती ही निसर्गाच्या चक्राबरोबर जोडली गेलेली आहे.पूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती.परंतु भारतात मागील १००-१५० वर्षात जो विकास झाला तो पाश्चात्य देशांच्या विचार प्रभावाने झाला. यामुळे विकासाचे केंद्रीकरण होऊन मोठमोठी शहरे निर्माण झाली. याचा परिणाम वाढत्या शहरीकरणामुळे खेडी ओस पडली.
शहरीकरणामुळे माणसांची व वाहनांची गर्दी,प्रदूषण,कचरा संकट,गुन्हेगारी, पर्यावरणाचा ऱ्हास, आरोग्य याचे दुष्परिणाम आपणास जाणवू लागलेले आहे.त्यामुळे पुन्हा खेड्याकडे येण्यास लोक उत्साही आहेत..परंतु त्यांना आकर्षण वाटेल , त्यांना रोजगार निर्माण होईल अश्या व्यवस्था आज गावात उपलब्ध नाहीत.लोक आनंदाने पुन्हा गावाकडे यावेत यासाठी आपणास गावात काही बदल करवून नवनवीन पर्याय निर्माण करावे लागणार आहेत.यासाठी आपणास किफायतशीर ,विषमुक्त शेती,उत्पादन व विक्री,शेतीमाल प्रक्रिया उद्योग ,इतर कुटीर उद्योग याबद्दल एक सकारात्मक वातावरण गावामध्ये तयार करावे लागणार आहे.याशिवाय गावात स्वच्छता, दर्जेदार शिक्षण, किमान आरोग्य सुविधा, आवश्यक जलसंवर्धन, वन संवर्धन, ऊर्जा अश्या आवश्यक आयामातही काम करावे लागेल.
हे सर्व करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होणे गरजेचे आहे.उदाहरणार्थ शासन, सयंसेवी संस्था,तसेच लोकसहभाग,निस्वार्थ कार्यकर्ते ."ग्राम सेवाची ईश्वरसेवा,ऐसे समजावून जिवा" या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे,तसेच आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेतलेल्या,येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जात,कोणताही भेदभाव न करता,समस्त गावकऱ्यांना आपले कुटुंब मानून,त्यांच्या कल्याणाकरिता निस्वार्थ मनाने अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्याची फळी उभी करावी लागेल. विनोबा भावे असे म्हणत की "आपला देश हा पारतंत्र्य खेड्यांचा स्वातंत्र देश आहे". आपल्यासमोर "स्वतंत्र खेड्यांचा स्वतंत्र देश करण्याचं आव्हान आहे".स्वतंत्र खेडे म्हणजे स्वावलंबी खेडे,स्वयंपूर्ण खेडे.यासाठी गावाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.फक्त भौतिक विकास झाला म्हणजे सर्वांगीण विकास झाला असे नाही.
तसे झाल्यास शहर आणि खेडी यात फरक उरणार नाही. खेड्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे कारण खेड्याचा सर्वांगीण विकास भारत देशाला महासत्ता बनवेल असे मत ऋतुगंध फौंडेशन देवटाकळी, ता. शेवगाव अध्यक्ष कैलास जाधव यांनी माय सह्याद्री शी बोलताना व्यक्त केले. खेड्याचा सर्वांगीण विकास(ग्रामविकास)करण्यासाठी काही घटकांवर काम करावे लागेल..
१) शेती
शेती म्हणजे निसर्गाकडून माणवास मिळालेली अनमोल भेट.परंतु गेली २५-३० वर्षांपासून बेसुमार पाणी, कीटकनाशके,रासायनिक खते यांचा वापर करून शेती नापीक केलेली आहे.त्यामुळे शेती पुन्हा सुपिक बनविणे आपल्यासमोर प्रमुख आव्हान आहे.त्यासाठी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती,किफायती शेती अश्या गोष्टीत आपणास प्रगती करावी लागेल.
२) पाणी
शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्यासंबधी प्रमुख दोन प्रश्न आहेत..एक तर शेतीयोग्य पाणी उपलब्ध करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी मोठमोठ्या धरणावर अवलंबून न राहता गावातच छोटे बंधारे बांधणे, पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या योजना,शोषखड्डे घेणे,शेताला मोठमोठे बांध घालणे असे उपाय योजावे लागतील.पाणी उपलब्ध झाल्यास त्याचे योग्य नियोजन करावे लागेल.त्यासाठी ठिबकसिंचन,तुषार सिंचन करणे,कमी पाण्याचे पीक तंत्र विकसित करणे कूपनलिका,विहिरी यांची खोली मर्यादित ठेवणे असे उपाय करावे लागतील.
३) वन
निसर्गाचे समतोल राखण्यात वनांचे खूप मोठे योगदान असते.प्रदूषण कमी करून हवा शुध्द ठेवणे,पाऊस पडण्यास मदत,जमिनीची धूप थांबवणे तसेच उत्पन्नाचे साधन म्हणूनही वनांचे महत्व आहे..वनसंपदा वाढवणे तसेच आहे त्याचे संरक्षण करणे या घटकांवर आपणास काम करावे लागेल.
४) पशुधन
देशी गाय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान आहे..मधल्या काळात व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवल्यामुळे तसेच संकरित गाईचे प्रमाण वाढत गेल्यामुळे देशी गाई,बैल या उपयुक्त पशुधनाचे प्रमाण कमी होत गेले.याचे अनेक दुष्परिणाम आपण भोगतो आहोत.संकरित गाईंच्या दुधामुळे अनेक वाईट परिणाम आपल्या शरीरावर झालेले आहेत.शेतात बैलांचा वापर कमी झाल्यामुळे व यांत्रिकीकरण याचे प्रमाण वाढल्यामुळे शेती खर्चिक बनली आहे.शेतीला शेंद्रिय खत न मिळाल्यामुळे शेती नापीक झालेली आहे..जर आपन गावात पशुधन वाढवू शकलो तर पशू व्यापार,शेतीसाठी खत, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती,शेण व गोमूत्र यांपासून औषधी वस्तू बनविणे यांसारखे उद्योग सुरू करून त्यापासून रोजगारनिर्मिती, आरोग्य,शेती या विषयात आपण प्रगती करू शकतो.
५) जीवसृष्टी
गावातील जीवसृष्टीही गावातील सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे. गांडुळासारखे किटक हे शेतीसाठी वरदान ठरतात.जलाशय स्वच्छ ठेवण्यासाठी मासे उपयोगी पडतात.अश्या सर्व सजीव जीवसृष्टीचा वापर आपण ग्रामविकासासाठी करू शकू.
६) ऊर्जा
ग्रामीण भागात विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. यावर उपाय म्हणून सौरऊर्जा, पवनऊर्जा, गोबरगॅस यांसारखी ऊर्जेचा वापर करून आपण या समस्यावर मात करू शकू.
७) शिक्षण
गावामध्ये मूलभूत दर्जेदार शिक्षणाची सोय हवी. तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आपल्या उपलब्ध साधनांच्या आधारे करण्यासारखे व्यवसायाचे कौशल्य विकास प्रशिक्षणही गावातच मिळावे.त्यामुळे उद्योजक,व्यावसायिक गावातच तयार होतील व यातून रोजगार निर्मिती होईल.
८) आरोग्य
आरोग्यम धन संपदा" अस आपण म्हणत असतो.माणसाचे जर आरोग्य ठीक नसेल तर भौतिक सुखाच्या साधनांचा त्याला काहीही उपयोग नाही. म्हणून आपल्या गावातील सर्वांचे आरोग्य कसं उत्तम राहील याकडे लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी गावात स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी , सर्वांचा दिनक्रम नैसर्गिक, व्यायाम,विषमुक्त भाजीपाला अश्या गोष्टीवर भर द्यावा लागेल.त्यामुळे लोक आजारी पडणार नाही.जर चुकून कुणी आजारी पडलच तर प्रार्थमिक उपचाराची सोय गावातच असावी.
९) संस्कार
गावातील सर्व नागरिक संस्कारयुक्त असावेत.माणसाचे शरीर जेवढे निर्मळ हवे तसेच मनही. मनाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्यावर वारंवार संस्कार होणे गरजेचे आहेत. त्यासाठी गावात बालसंस्कार वर्ग, सत्संग,व्याख्याने, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम वारंवार व्हावेत.
१०) स्वावलंबन
वाढत्या शहरिकरणाचे एक प्रमुख कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी.जर शहरी भागातील या संधी गावातच उपलब्ध झाल्या तर गावातील स्थलांतर थांबेल व स्थलांतरित झालेली लोक पुन्हा गावी येतील. त्यासाठी प्रत्येकाला स्वावलंबी बनवले पाहिजे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण त्यांना मिळावे.व त्यांना प्रोत्साहन मिळेल असे सकारात्मक वातावरण निर्माण करावे लागेल.
पुढील काळात खेडेच देशाचा आधार बनतील
वरील सर्व विषयांत काम करून आपण आपले गाव स्वयंपूर्ण बनवू शकतो.एकाएकी हे होणार नाही.त्यासाठी सातत्य लागेल. विकास ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. परंतु सतत च्या आणि सर्वांच्या प्रयत्नाने आपले गाव नक्कीच स्वयंपूर्ण होतील. तसे अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. असें खेडेच देशाचा आधार बनतील. लोक खेड्यातच आनंदाने राहतील.विकासाचे शहरांमध्ये झालेले केंद्रीकरण संपेल.त्यामुळे अनेक प्रश्न विनासायास सुटतील.राष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम बनेल व खऱ्या अर्थाने स्वतंत्र खेड्यांचा स्वतंत्र देश बनेल..
श्री. कैलास किसन जाधव अध्यक्ष-ऋतुगंध फौंडेशन देवटाकळी, ता. शेवगाव मो-७८२२९९४४७८
माय सह्याद्री टीम शंकर मरकड / अशोक वाघ. शेवगाव
संपूर्ण ईमेल - mysahyadrilive@gmail.com