अहमदनगर,शेवगाव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे केली मागणी, शैक्षणिक हिताचा निर्णय घेण्याची विनंती.

कोरोना लॉकडाऊन पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून पुढील काळासाठी ठरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक ध्येयधोरणात काही बदल करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अॅड. विद्याधर काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे केले आहे. 


कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे थोड्या उशिराने का होईना सुरू होणार आहे. त्यामध्ये प्रचलित नियमानुसार प्राथमिक व माध्यमिक स्तरावर पटसंख्या ,शिक्षक संच मान्यता व तुकड्यांना मान्यता देताना साधारणपणे ३५ विद्यार्थ्यांची तुकडी ग्राह्य धरली जाते. तथापि वाढीव तुकड्यांना मान्यता देताना पहिल्या तुकडीत ६० विद्यार्थी संख्येची अट ठेवुन पुढील तुकड्या निश्चित केल्या जातात. 

तसेच उच्च माध्यमिक स्तरावर प्रथम तुकडीत ८० विद्यार्थ्यांची अट ठेवून पुढील तुकड्या निश्चित केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी प्रवेशाची मागणी व शिक्षण हक्क कायदा लक्षात घेता बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो. जास्त संख्यामुळे विद्यार्थ्यांना दाटीने वर्गामध्ये बसावे लागते. यावर शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

मागील काही वर्षांपासून शिक्षक व इतर कर्मचारी भरती शासनाने न केल्यामुळे संस्था व शाळांना तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमावे लागले आहेत. त्यांचा पगार संस्था कसाबसा करीत आली आहे. परंतु पुढील काळात आर्थिक मंदीमुळे व इतर आर्थिक अडचणींमुळे हे शक्य होणार नाही. तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा गांभीर्याने विचार होऊन या शिक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. 

पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१  सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणे व मार्गदर्शक तत्वे आखून ती संबंधित घटकापर्यंत पोहोचवावी लागतील. कारण एकतर शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होऊ शकते. त्यामुळे त्यात पुढील कार्यवाहीसाठी उशीर होऊ नये याचाही आपण गांभीर्याने विचार करावा. यासह अनेक प्रश्न या निवेदनात मांडले गेले आहे. या निवेदनावर आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अॅड. विद्याधर काकडे, मध्यवर्ती समितीचे प्रमुख विश्वनाथ देवडे व प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ यांच्या सह्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने